हॉस्पिटल्समधील कोव्हॅक्सीन कुपींच्या तुटवड्यामुळे तीन पैकी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सीनचा दुसरा डोस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना डॉक्टर्स आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून माघारी धाडले जात आहे.
जर एखाद्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आलेला असेल तर ठराविक कालावधीनंतर दुसरा डोस देणे गरजेचे असते. तथापि ज्यांनी 45 दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोसासाठी अद्यापही वाट पहावी लागत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सिव्हील हॉस्पिटलमध्ये सध्या व्हॅक्सीनचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे नागरिकांसमोर व्हॅक्सीनचा नवा साठा येईपर्यंत वाट पाहत बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
गेल्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील कोरोनाची दुसरी लाट प्राथमिक अवस्थेत होती. या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रासह सरकारी हॉस्पिटल्समध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना व्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला. त्यावेळी त्यांना दुसरा डोस 21 दिवसानंतर दिला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागताच आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तो डोस 40 दिवसानंतर दिला जाईल, असे सांगून माघारी पाठवण्यास सुरुवात केली आहे.
आता हा 40 दिवसांचा कालावधी 45 दिवस इतका वाढविण्यात आला आहे. नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यास विलंब होण्याचे कारण कोव्हॅक्सीन कुपींचा तुटवडा हे आहे. परंतु यावर पांघरूण घालण्यासाठी आरोग्य अधिकारी मात्र 40 दिवसांचा खंड हा औषधाचा परिणाम होण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे सांगताहेत.
तथापि 40 दिवस उलटून गेले तरी अद्याप व्हॅक्सीनचा पत्ता नसल्यामुळे पहिला डोस घेतलेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांचे उंबरठे झिजवत आहेत. प्रत्येक वेळी या सर्वांना व्हॅक्सीन उपलब्ध नसल्याने नाराज होऊन परतावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा आरसीएच ऑफिसर डॉ. आय. पी. गडाद यांच्या माहितीनुसार कोव्हॅक्सीनचा तुटवडा फक्त बेळगावातच नाही तर संपूर्ण राज्यात निर्माण झाला आहे.
सध्या दिवसाकाठी फक्त 13,000 डोस दिले जात आहेत. कोव्हॅक्सीन कुपींच्या नव्या साठाचे येत्या दोन दिवसात आगमन होण्याची शक्यता असल्याचेही डॉ गडाद यांनी सांगितले.