Monday, January 13, 2025

/

रेमडेसिवीरचा तुटवडा? : औषध वितरण कंपनीकडून नागरिकांना मनस्ताप

 belgaum

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सध्या गरजेच्या काळात शहरातील एका नामांकीत औषध वितरण कंपनीकडून रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगून नागरिकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कॉलेज रोडवर असणाऱ्या एका नामांकित औषध वितरण कंपनीमध्ये सध्या कोरोनासंदर्भातील रेमडेसिवीर या औषधाची खरेदी करण्यास गेलेल्या नागरिकांना विनाकारण ताटकळत ठेवून शेवटी स्टॉक नसल्याचे कारण सांगून माघारी धाडले जात आहे. याठिकाणी रेमडेसिवीर खरेदी करण्यास गेलेल्यांना ‘स्टॉक आहे का पाहतो’ असे सांगून अर्धा-पाऊण तास ताटकळत बसवून ठेवले जाते.

त्यानंतर स्टॉक संपल्याचे सांगून माघारी धाडले जाते. यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच मनस्तापही होत असून रुग्णाला संबंधीच्या चिंतेत भर पडत आहे. खुद्द डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, त्यांचे पत्र आदी सर्व कागदपत्रे असून देखील संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून त्याची जरा ही दखल घेतली जात नाही. तुम्हाला रेमडेसिवीर हवे असेल तर एडीसींची (सहाय्यक औषध नियंत्रक) परवानगी घेऊन या असे सांगितले जाते. बऱ्याचदा एडीसींचे नांव सांगून देखील या ठिकाणी रेमडेसिवीर दिले जात नाही.Injection remedesiver

या पद्धतीने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपयोगी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे हेतुपूर्वक भासवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यासंदर्भात जाब विचारला असता काळ्याबाजारात रेमडेसिवीरची विक्री होत असल्यामुळे तुटवडा निर्माण झाल्याचे कारण सांगितले जात आहे.

रेमडेसिवीरचा जर काळाबाजार होत असेल तर त्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्याइतपत प्रशासन सक्षम नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान सध्याच्या गरजेच्या काळात कॉलेज रोडवरील संबंधित औषध वितरण कंपनीमध्ये रेमडेसिवीर देण्यास टाळाटाळ करण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कारण सध्या हे इंजेक्शन म्हणजे एखाद्याचा जीवन-मरणाचा प्रश्‍न असू शकतो. तेंव्हा लोकप्रतिनिधींसह आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कॉलेज रोडवरील संबंधित औषध वितरण कंपनीला योग्य ती समज द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.