कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कोरोना लसींची मागणीही वाढत चालली आहे. बेळगाव जिल्ह्यातही रुग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे.
जिल्हा रुग्णालयात लसींची मागणी वाढत चालली आहे. परंतु लसीचा अनियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी नागरिकांना लस घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत आहेत. परंतु लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील अनेक भागात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. गावागावांत असणार्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातूनही लस देण्यात येत आहे; मात्र जिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीचा साठा संपला असल्याने नागरिकांना लस उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिकांना माघारी जावे लागत आहे.
यासंदर्भात बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये जानेवारीपासून लस अभियान सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक लोकांना रुग्णालयात लस देण्यात आली असून गेल्या चार दिवसांपासून व्हॅक्सिनचा पुरवठा कमी झाला आहे.
कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी झाल्याने कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. सध्या कोविशिल्डचाही साठा संपला आहे. लवकरच पुरवठा होईल. जिल्हा रुग्णालयात लस अनुपलब्ध झाल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्याचे आवाहन डॉ. विनय दास्तीकोप यांनी केले आहे.