ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या विरोधात जी कृती केली आहे, त्याबद्दल राज्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक असणाऱ्या मंत्री जगदीश शेट्टर आणि उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार करणे ईश्वरप्पा यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांना शोभत नाही. येडियुरप्पा कांहीही झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. राज्यपालांना पत्र लिहिण्यापूर्वी ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. कॅबिनेटमध्ये आपला प्रस्ताव मांडून चर्चा करण्याऐवजी त्यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहिल्याबद्दल जगदीश शेट्टर यांनी असंतोष व्यक्त केला.
ईश्वरप्पा यांनी मनात येईल ते करण्याऐवजी चार भिंतीमध्ये त्या संदर्भात चर्चा करायला हवी होती. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिणे उचित नसले तरी त्याचा परिणाम पोटनिवडणुकांवर होणार नाही. पोटनिवडणुकीत या विषयावर चर्चा होणार नाही. निवडणुकीत भांडवल करण्याजोगा कोणताही विषय काँग्रेसला मिळालेला नाही. तो मिळाला असता तर त्यांनी आत्तापर्यंत जग डोक्यावर घेतले असते असेही शेट्टर म्हणाले.
या निवडणुकीमुळे राजकीय बदल होईल असे सतीश जारकीहोळी म्हणत आहेत, याबद्दल प्रतिक्रिया विचारता काँग्रेस नेते प्रत्येक वेळी हेच सांगत आले आहेत. मात्र तसे कांही घडणार नाही, मुख्यमंत्री येडीयुरप्पाच यापुढे देखील समर्थपणे सरकार चालवतील, असा विश्वास जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी देखील ईश्वरप्पा यांच्या कृतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचा सारख्या उच्चपदस्थ व्यक्तीला आमच्यासारख्यांनी कोणताही प्रश्न विचारणे योग्य नाही, असे सांगितले.