केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना आणि सुविधांविषयी उपस्थित कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबविण्याचा सल्ला उपस्थित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. अनेक भागात ऑक्सिजनची कमतरता आहे.
परंतु याठिकाणी कोणत्याही प्रकारे रुग्णांना किंवा येथील कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यावी. आवश्यक असलेल्या वस्तूंसाठी आम्हाला तत्काळ संपर्क करा. कोणत्याही अडचणीच्या वेळी आपण सहकार्य करू, असे आश्वासन सतीश जारकीहोळी यांनी दिले. यासोबतच आरोग्यकेंद्राविषयी इतर गोष्टींची माहितीही त्यांनी घेतली.
प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यापूर्वी सतीश जारकीहोळी यांनी ग्रामपंचायत सदस्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत विकासकामांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, गाणी दर्गा, किरण राजपूत, महांतेश मगदूम, दस्तगीर बसापुरी, वंदना टुबाची, जावेद जखती, अस्लम पाकली, रवी जिंद्राली यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.