काँग्रेसचे अधिकृत आमदार सतीश जारकीहोळी यांनी तालुक्यातील दक्षिण भागात आज प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या जाहीर प्रचाराचा आज पहिलाच दिवस असून दक्षिण विभागातील गावांमध्ये त्यांना भरघोस पाठिंबा व्यक्त करण्यात आला. धामणे गावापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. धामणे गावातील शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली.
येळ्ळूर, मच्छे,मजगाव टिळकवाडी अश्या अनेक दक्षिण मतदार संघातील भागात सतीश जारकीहोळी यांनी पद यात्रा काढल्या व मतदारांचे आशीर्वाद मिळवले.
त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेच्या ठिकाणापर्यंत सतीश जारकीहोळी यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. प्रचारसभेच्या व्यासपीठावर खानापूर मतदारसंघाच्या आमदार अंजलीताई निंबाळकर, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आदींसह ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी सतीश जारकीहोळी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी खानापूर आमदार अंजलीताई निंबाळकर, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आदींची भाषणे झाली. या सभेला वीरकुमार पाटील, तालुका पंचायत अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सभेला जनतेची उपस्थिती लक्षणीय होती.