राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी आणि विचारविनिमय करण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या सर्वपक्षीय सभेचे नेतृत्व राज्यपालांनी करणे चुकीचे आहे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारी बंगळूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले की, राज्यपालांना सरकारला याबाबत सल्ला देण्यास संधी होती. पण थेट सर्वपक्षीय सभेत त्यांचा सहभाग असणे हे चूक आहे. कोरोना नियंत्रणावरून भाजप सरकार गोंधळात सापडले आहे.
लॉकडाउनच्या बाबतीत तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रत्येक मंत्री वेगवेगळी विधाने करत आहेत. संघटितपणे निर्णय घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.
राज्य आता राज्यपालांचे संस्थान झाले आहे. तेच नेतृत्व स्वीकारून सर्वपक्षीय सभा घेत आहेत. राज्यात कोविड परिस्थिती हाताबाहेर जात आहे, याबाबत सतीश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जोवर कोविड परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोवर आगामी निवडणुकांचे आयोजन करण्यात येऊ, नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.