बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या भागातील गोकाक आणि अरभावी परिसरात प्रचाराची जोरदार आघाडी उघडली असून झंझावाती प्रचार दौरे सुरू केले आहेत.
सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका आणि पुत्र राहुल हे दोघे आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ गोकाक आणि अरभावी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी देखील गोकाक व अरभावी भागात झंझावती प्रचारद्वारे हाती घेतले असून त्यांना सर्वत्र वाढता पाठिंबा मिळत आहे. आपल्या प्रचार फेरीद्वारे जारकीहोळी प्रत्येक गावातील घराघरापर्यंत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतांची याचना करत आहेत. प्रचार फेरी दरम्यान प्रत्येक गावात ठिकठिकाणी सुहासिनी सतीश जारकीहोळी यांचे पंचारतीने औक्षण करून त्यांना सुयश चिंतताना दिसत आहेत.
बेळगाव लोकसभा मतदार संघामध्ये केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, ए. बी. पाटील, एच. के. पाटील, आमदार अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, विणा काशप्पनावर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी सध्या काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचाराला वाहून घेतल्याचे पहावयास मिळत आहे.