संयुक्त महाराष्ट्र आणि शिवसेना आणि बेळगाव हे नातं अतूट आहे या लोकसभेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
बेळगावच्या संयुक्त महाराष्ट्र चौकात शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांच्या प्राचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. बुधवारी सायंकाळी चार वाजता ते नाथ पै सर्कल मधून पदयात्रा सहभागी होणार असून सायंकाळी 6 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौकात जाहीर सभा होणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान येत्या 17 एप्रिलला होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार संजय राऊत उद्या बुधवार दि. 14 एप्रिलला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळकेच्या प्रचारासाठी बेळगावात येत आहेत त्या निमित्ताने प्रचारार्थ अधिक उत्साह निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आणि म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे सध्याच्या युवा पिढीचे धडाडीचे नेतृत्व आहे. आपल्या संघटनात्मक कौशल्याने युवकांना एकत्रित करणाऱ्या शेळके यांनी राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही; पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी झाले आहेत.
आजवरच्या त्यांच्या धडाडीच्या यशस्वी कार्यामुळेच तरुणवर्गातून त्यांचे नांव पुढे आले आहे. आता त्यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे. यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघात मराठी म्हणून जो कोणी आहे, त्याचे मत शुभम यांना पडावे, हे एकमेव ध्येय आता समस्त युवावर्गाने स्वतःच्या उराशी बाळगले आहे.
शुभम शेळके याच्या प्रचारासाठी लोक स्वत:हून वर्गणी गोळा करत आहे. जिथे शुभम प्रचाराला जाईल तिथे लोकं ५०० ते १००० रुपयांची मदत करत आहेत. शुभम शेळके यांच्या प्रचाराला तरुणांसह म.ए. समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच मराठी भाषिकांनी दाखविलेला उस्फुर्त पाठिंबा पाहून राष्ट्रीय पक्षाचे नेतेही चकित झाले आहेत. तरुण वयात सिद्ध केलेल्या कर्तृत्वामुळेच भाजपा, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही शुभम शेळकेची दखल घेणं भाग पडलं आहे.
एकंदर संजय राऊत तिसऱ्यांदा बेळगावला येत असून राऊत यांचे संयुक्त महाराष्ट्र चौक, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि बेळगाव यांच्याशी एक वेगळे नाते आहे. यासाठीच संजय राऊत यांची मुलुख मैदान तोफ संयुक्त महाराष्ट्र चौकात धडाडणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात 1969 साली शिवसेनेने 67 हुतात्मे दिले होते. त्याचीच स्मृति असणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चौकामध्ये खासदार संजय राऊत जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळेच या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.