विरोधकांना जेव्हा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी बेळगावात आणावे लागते. एवढी ताकद लावावी लागते याचा अर्थ शिवसेना -समिती युतीचा उमेदवार शुभम शेळके याने निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे हे चित्र स्पष्ट आहे, असे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना व म. ए. समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आज दुपारी बेळगाव विमानतळावर आगमन झाले. याप्रसंगी शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन शुभम शेळके यांच्या स्वरूपात तरुण तडफदार उमेदवार बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभा केला आहे. त्याला पाठिंबा देणे. पाठबळ देणे. हे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाचे कर्तव्य आहे. फक्त महाराष्ट्रात बसून इशारे देणे ठीक आहे. परंतु मी मात्र इथे एका कर्तव्यभावनेने आलो आहे. शिवसेनाप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी मला स्वतः सांगितले आहे की बेळगावला जा आणि समितीच्या उमेदवाराला सक्रिय पाठिंबा द्या, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.
निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात थोडेफार निराशाजनक वातावरण होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला 50 हजार मते पडतील की नाही अशी शंका व्यक्त होत होती. मात्र आता शिवसेना -समिती युतीचा उमेदवार विजयी होईल अशा प्रकारची लढत येथे सुरू आहे. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येथे आले आहेत. उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहेत. पंतप्रधान येतील की नाही मला माहीत नाही. जर एवढी ताकद लावावी लागते याचा अर्थ शिवसेना -समिती युतीचा उमेदवार शुभम शेळके यांने जोरदार मुसंडी मारली आहे हे स्पष्ट होते असे सांगून महाराष्ट्रात बेळगावच्या पोट निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
आम्हाला कोणी रोखत असेल तर त्यांना आम्हाला सांगायचे आहे की येथील लोक पाकिस्तान मध्ये राहत नाहीत आणि आम्ही कांही लष्कर-ए-तोयबाचे लोक नाही आहोत. आम्ही सुद्धा तुमच्या सारखे प्रकार राष्ट्रवादी व प्रखर हिंदुत्ववादी लोक आहोत. मराठीचा हा लढा म्हणजे हिंदुत्वाचा लढा आहेह छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्धचा लढा आहे. हा वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचा लढा आहे. आम्ही न्यायासाठी लढतो आहोत. आमचे तुमच्याशी वैयक्तिक कांहीही भांडण नाही, असे खासदार राऊत पुढे म्हणाले.
बेळगाव लोकसभा पोट निवडणूक लढविण्याचा मुख्य मुद्दा सांगताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ज्या लढ्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. तुरुंगवास भोगला. गेली 60 -70 वर्षे येथील लोक लाठ्याकाठ्या खात आहेत. जेलमध्ये जात आहेत, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जीवनातील तीन महिने तुरुंगात घालवले ते याच लढ्यासाठी होते आणि याच लढ्यासाठी शिवसेनेने 67 हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा काय असणार आहे. आम्हाला आमच्या रक्ताची किंमत मिळायला हवी असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत ठीक नाही अन्यथा तेदेखील शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी बेळगावला आले असते असेही खासदार राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.