वनविभागाच्या विशेष भरारी पोलिस पथकाने हणमापूर (ता. अथणी) येथे ९० हजार रुपये किंमतीच्या ३० किलो चंदनाची तस्करी करणाऱ्या सराईटला अटक केली आहे.
राजू विठ्ठल शिंगे (रा. ऐनापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याचा साथीदार जानप्पा उर्फ पिंटू रामाप्पा मेकळी (रा. निडगुंदी) हा दुचाकीसह फरार झाला आहे.
पोलिस निरीक्षक रोहिणी पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक पाटील यांना मुरगुंडी नेमदभावी रस्त्यावर हणमापूरच्या वळणावर दोघे दुचाकीवरून चंदन लाकडाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पाटील यांनी हवालदार एम. आर. आरविंची, के.डी. हिरेमठ, बी. बी. इंगळगी यांच्यासह सापळा रचला. राजू शिंगे व जानप्पा दुचाकीवरून प्लास्टिक पोत्यातून सुमारे ९० हजार रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे दिसून आले.
यावेळी जानप्पा हा पथकाच्या तावडीतून निसटला. राजूवर गुन्हा दाखल करून त्याला अथणी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती उपनिरीक्षक पाटील यांनी दिली.