बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी आज बेळगाव दक्षिणेच्या ग्रामीण भागातील बुथवार कमिट्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी आज शुक्रवारी बेळगाव दक्षिणेकडील ग्रामीण भागात असलेल्या धामणे, मासगोनट्टी, राजहंसगड, देवगनहट्टी व कुरबरहट्टी या गावांचा दौरा केला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत जि. पं. सदस्य रमेश गोरल आणि काँग्रेसच्या बेळगाव दक्षिण ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील व इतर उपस्थित होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान आर. व्ही. देशपांडे यांनी धामणे, मासगोनट्टी, राजहंसगड, देवगनहट्टी व कुरबरहट्टी या भागातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक बुथ कमिटीवरील कामाबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले.
संबंधित प्रत्येक गावातील बैठका आटोपल्यानंतर माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी येळळूर राजहंस गडाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी गडावरील श्री सिद्धेश्वर देवालयात जाऊन देव दर्शन घेतले. त्यानंतर ताजेतवाने होण्यासाठी आरव्हींनी गडावर फेरफटका मारून निवडणूक प्रचार रणधुमाळीमुळे अंगात आलेला शीण घालविला. यावेळी जि. प. सदस्य रमेश गोरल यांनी त्यांना राजहंस गडा बाबत माहिती दिली.