कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी सरकारने एकीकडे उद्यापासून लॉक डाऊन जाहीर करताच दुसरीकडे खडबडून जाग्या झालेल्या तळीरामांनी एमआरपी दुकानांसह सर्व बार व रेस्टॉरंट्स समोर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र आज दुपारी शहरात सर्वत्र पहावयास मिळाले.
राज्यातील चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने उद्यापासून राज्यभरात लॉक डाऊनचा आदेश जारी केला आहे. समाजमाध्यमांवर आणि टीव्हीवर झळकलेले सदर वृत्त आज वाऱ्यासारखे शहरात पसरताच शहरातील मद्यपी परिवार खडबडून जागा झाला आणि अल्पावधीत एमआरपी दुकानांसह सर्व बार व रेस्टॉरंट्स समोर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
खडबडून जाग्या झालेल्या मद्यपींनी एकमेकाला मोबाईलवर संपर्क साधत, मेसेज टाकत खात्री करून घेत आणि माहिती देत-घेत त्यांनी तडक दारू दुकाने गाठली.
लॉक डाऊनच्या 14 दिवसांचा जामानिमा करण्यासाठी पैशांची तजवीज करत, काहींनी उधारी-उसनवारी करत मद्य विक्रीची दुकाने गाठून ‘अगदी शिस्तीत’ लांबच लांब रांगा लावल्या. ‘अरे उद्यापासून मिळेल कि नाही काय सांगता येत नाही, आजच घेऊन टाक’ असा मैत्रहिताचा सल्ला देत-घेत अनेकांनी पंधरवड्याचा साठा पदरात पाडून घेतला.
पैसे कमी असलेले काहीजण उधारी देण्याची विनंती दुकानमालकांना करताना दिसून आले.या वेळी प्रत्येक जण आपल्या पसंतीचा ब्रँड मिळवण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत होता.
एकंदरीत लॉक डाउन जाहीर होताच तळीरामांनी दारू दुकानांसमोर लावलेल्या लांबच लांब रांगा बेळगावकरांचे लक्ष्य वेधून घेत होत्या.या लॉक डाऊन मध्ये दारू दुकाने पार्सलसाठी सकाळच्या सत्रात उघडी असणार आहेत.