Monday, January 20, 2025

/

…आणि रस्त्यावर अवतरला मराठी भाषिकांचा अलोट जनसागर!

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बेळगावात दाखल झालेले महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भव्य मिरवणूक आज सायंकाळी अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषात पार पडली. मिरवणुकीत हजारोच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाल्यामुळे रस्त्यावर विरोधकांच्या उरात धडकी भरविणारा जणू जनसागर अवतरला होता.

मुंबई येथून विमानाने बेळगावात दाखल झालेले महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे आज सायंकाळी हजारो मराठी भाषिकांच्या उपस्थित शहापूर शिवाजी उद्यान येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह स्थानिक शिवसेनेचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीचे पूजन करून महाराजांना अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवाजी उद्यानापासून सुरू झालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी शिवसेना समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके होते आणि त्यांच्या मागोमाग कारगाडीमध्ये उभे असलेले खासदार संजय राऊत हात उंचावून सर्वांना अभिवादन करत होते.

मिरवणुकीत बेळगाव शहर परिसरासह तालुक्यातील हजारो मराठी भाषिक तसेच समिती आणि शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे मिरवणुकीचा सुमारे दीड -दोन किलोमीटरचा मार्ग जनसागराने व्यापल्याचे दिसून येत होते. बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, सिंह -समितीचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणांनी मिरवणुकीत सहभागी मराठी भाषिकांनी मिरवणूक मार्ग दणाणून सोडला होता. मिरवणूक पाहण्यासाठी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. बहुमजली इमारतीतील लोकांनी आपल्या गच्ची आणि गॅलरीमध्ये मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

मराठी द्वेष्ट्या कर्नाटक सरकारने शुभम शेळके यांच्या जेथे-जेथे प्रचार सभा झाल्या त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करून अडथळा निर्माण करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. तोच प्रकार आज मिरवणुकीप्रसंगी दखील पहावयास मिळाला. मिरवणुकीला सायंकाळी उशिरा प्रारंभ होताच मिरवणूक मार्गावर असलेल्या कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजवरील पथदीप बंद करून अंधार निर्माण करण्याद्वारे प्रशासनाने आपली आकस बुद्धी आणि कोणत्या वृत्तीचे प्रदर्शन घडविले. तथापि या प्रकाराला भिक न घालता मिरवणुकीत सहभागी मराठी भाषिकांनी स्वतःच्या उत्साहावर विरजण पाडू न देता अत्यंत जल्लोषात कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज ओलांडला.

मिरवणुकीत सहभागी मराठी भाषिकांनी डोक्यावर परिधान केलेले भगवे फेटे, भगव्या टोप्या तसेच डौलाने फडकणारे भगवे ध्वज साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते. अभूतपूर्व उत्साह आणि हजारोंचा जनसमुदाय असताना देखील संयुक्त महाराष्ट्र चौक येथे विरोधकांच्या उरात धडकी भरवणाऱ्या या मिरवणुकीची यशस्वी सांगता झाली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.