राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम अनेक भागावर पडला असून या संपामुळे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सदर विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १६ रोजी आणि पदव्युत्तर परीक्षा २७ रोजी होणार आहेत. सलग दुसरे दिवशी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या एकूण ९ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परंतु सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, ही मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. ही मागणी मान्य करावी, या मागणीसाठी परिवहन कर्मचारी हट्टाला पेटले आहेत.
परिणामी याचा फटका परिवहन खात्याला आणि जनतेलाही बसत आहे. अनेक विभागामध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी वाहतूकदेखील सुरु आहे.
परंतु खाजगी वाहनचालकांकडून दुप्पट दर आकारण्यात येत असल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.