राणी चन्नमा विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील आदेशापर्यंत परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे म्हटले आहे.
परीक्षांच्या तारखांत वारंवार बदल होत असल्याने विद्यार्थ्यांतूनही नाराजी दिसून येत आहे. परिवहन महामंडळाचे कर्मचारी ७ एप्रिलपासून संपावर आहेत.
त्यामुळे विद्यापीठाने यापूर्वी ७ ते ९ एप्रिलपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा आणखी एक तारीख जाहीर करून पदवीच्या ७ एप्रिलपासून १३ एप्रिलपर्यंत होणाऱ्या परीक्षा १९ ते २४ एप्रिलपर्यंत घेण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच पदव्युत्तरच्या ७ ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ ते २९ एप्रिलपर्यंत व एमबीए परीक्षेचे ७ ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ एप्रिल ते ४ मेपर्यंत होणार असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले होते. मात्र, अद्यापही परीवहन संप मिटला नसल्याने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंबंधी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.