कर्नाटकातील सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. सरकारमध्ये ना शासन आहे, ना शिस्त आहे. कर्नाटकात केवळ सर्कस सुरू आहे. अशी टीका काँग्रेसचे केंद्रीय चिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बेळगावात आलेले रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकातील येडियुराप्पा आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.
संपूर्ण देशात बदलाचे वारे वाहत आहेत. याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे, असे सांगत येडियुराप्पा आणि मोदी सरकारवर काँग्रेसचे केंद्रीय चिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी टीका केली. देशातील जनता मोदी सरकारच्या घोषणाबाजीला कंटाळली आहे. जनतेला आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्नाटकातील भाजपा सरकारमध्ये कोणताही सामंजस्यपणा नाही. महागाईबाबत कोणी बोलत नाही. विकास कामांबाबत बोलायचे नाही. भाजप सरकार पूर्णपणे गोंधळलेले आहे. असे सरकार राज्यातील जनता स्वीकारणार नाही आणि त्यासाठी पोटनिवडणुकांतून भाजपला जागा दाखवून देईल, असा विश्वास सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
बेळगावसह राज्यभरातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सतीश जारकीहोळी यांनी सर्वधर्मसमभाव जपत आजतागायत समाजसेवा केली आहे. त्यांच्यावर मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत विजयी होतील, यात काही शंका नाही. पण, देशात मोदी सरकारविरोधातील परिवर्तन कर्नाटकातून व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही सुरजेवाला यांनी सांगितले.
यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, एम. बी. पाटील, एस. आर. पाटील, आमदार अंजली निंबाळकर, फिरोज सेठ, काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, आर. व्ही. देशपांडे, रामलिंग रेड्डी, मुनियप्पा, विनय नवलगट्टी आदी उपस्थित होते.