बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यासाठी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी नुकताच मच्छे, पिरनवाडी व खादरवाडी या भागात झंझावाती प्रचार केला.
काँग्रेसचे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा बेळगाव दक्षिण मतदारसंघात नुकताच जोरदार प्रचार करण्यात आला. त्याअनुषंगाने जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी शनिवारी सायंकाळी मच्छे, पिरणवाडी व खादरवाडी या परिसरात प्रचार दौरा काढून जारकीहोळी यांचा प्रचार केला.
एका प्रचार सभेमध्ये बोलताना सतीश जारकीहोळी यांनी समाजातील तळागाळापर्यंतच्या सर्व गटांना सोबत घेऊन आजवरचे राजकारण व समाजकारण केले आहे त्यामुळे अशा व्यक्तीची बेळगावला गरज आहे भाजप सरकारने केलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.
तेंव्हा नागरिकांनी आपला असंतोष या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यावा असे सांगून लोकसभा पोटनिवडणुकीत सतीश जारकीहोळी यांनाच विजयी करा, असे आवाहन रमेश गोरल यांनी केले.
दरम्यान, काल रविवारी साप्ताहिक सुटीमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच आपला प्रचार सुरू ठेवला होता. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते ठिकाणी सभा घेऊन प्रचार करताना दिसून आले. बेळगाव शहर व तालुक्यात बरोबरच सौंदत्ती, बैलहोंगल, अरभावी यासह इतर मतदारसंघात सतीश जारकीहोळी यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.