बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक दिवसेंदिवस प्रतिष्ठेची आणि रंगतदार होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर अरभावी आणि गोकाक मतदारसंघात काँग्रेस आघाडी घेणार? की भाजप आघाडी घेणार? रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी यावेळी काय करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे गोकाक तालुक्यात राजकीय पक्षांचा ब्रँड चालत नाही, या ठिकाणी फक्त जारकीहोळी ब्रँडच चालतो. याठिकाणी पक्ष गौण असून गोकाक व अरभावी मतदारसंघातील जनतेला जारकीहोळी बंधूंना पाठिंबा देणे, त्यांना निवडून आणणे फक्त एवढेच माहित आहे. भालचंद्र जारकीहोळी व रमेश जारकीहोळी भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. अरभावी आणि गोकाक मतदार संघ या उभयतांच्या वर्चस्वाखाली आहेत. हे उभयता या मतदार संघाचे आमदार राहिले आहेत.
या दोघांचे बंधू सतीश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार म्हणून बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढवत आहेत. कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला की सर्व जारकीहोळी बंधू एकत्र येतात, एकजूट होतात हे सर्वश्रुत आहे.
तेंव्हा आता बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भालचंद्र जारकीहोळी आणि रमेश जारकीहोळी भाजपच्या बाजूने काम करणार? की आपले बंधू सतीश जारकीहोळी यांच्या बाजूने काम करणार? हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान अरभावी आणि गोकाक मतदार संघामध्ये जो आघाडी मिळतो तोच विजय होतो, असे येथील कार्यकर्त्यांचे ठाम मत आहे.