बेळगाव शहरात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला.
बेळगाव शहरात आज दुपारी साडेतीन पावणेचारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे छत्र्या -रेनकोट अभावी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
पावसापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण निवारा शोधताना दिसत होता. कांही काळ पडलेल्या या पावसामुळे उष्म्याने कोरडे पडलेले रस्ते पाण्याने भिजून गेले होते. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी चिखलाची दलदल निर्माण होऊन सखल भागात पाण्याची तळी साचली होती.
गेल्या कांही दिवसांपासून शहरातील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजच्या या पावसामुळे कांही काळ हवेत गारवा निर्माण झाला होता. परिणामी उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना अल्पकाळ दिलासा मिळाला.
त्याचप्रमाणे अचानक पडलेल्या या पावसाने निवडणूक प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांनाही कांही काळ विश्रांती घेण्यास भाग पाडले.