रेल्वेने रोज शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असताना बेळगाव रेल्वे स्थानकावर कोणतीही तपासणी करण्यात येत नसल्यामुळे शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. मात्र याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी आज बुधवारपासून रेल्वे स्टेशनवर तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे कोरोनाला थोपविण्यासाठी सरकारने कठोर मार्गदर्शक नियमावली जारी केली असताना दुसरीकडे त्याचे उल्लंघन असे सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव रेल्वे स्थानक येथे हाच प्रकार सुरू आहे. या रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे 20 -25 रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरू असते आणि हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मात्र येथे आरोग्य खात्याकडून कोणतीही आरोग्य तपासणी यंत्रणा ठेवण्यात आलेली नाही. बेळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रसह अन्य परराज्यातूनही मोठ्या संख्येने प्रवासी येत आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
गेल्यावर्षी बेळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची आरोग्य तपासणी, थर्मल टेस्ट करूनच रेल्वेत प्रवेश दिला जात होता. त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता तीव्र असूनही रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या कोरोना संदर्भातील तपासणीसाठी एकही व्यक्ती दिसून येत नाही.
रेल्वेने महाराष्ट्र, गोवा, गुजरात आदी राज्यातून दररोज शेकडो प्रवासी येत आहेत. यापैकी कांही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. तेथून बेळगावात येणाऱ्या लोकांमुळे शहरात संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
तेंव्हा जिल्हा प्रशासनाने बेळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी होत आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकातून विना तपासणी प्रवासी येत असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले आहे त्याचप्रमाणे रेल्वे हॉस्पिटलचे कर्मचारी आज बुधवारपासून प्रवाशांची तपासणी करतील असे जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी सांगितले.