गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बेळगावच्या प्यास फाऊंडेशनने स्वतः हाती घेतलेल्या मन्नीकेरी (ता. जि. बेळगाव) येथील तलाव प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.
बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणी संवर्धनासाठी झटणाऱ्या प्यास फाउंडेशनने 2 वर्षापूर्वी मन्नीकेरी गावानजीकच्या ज्या ठिकाणी फक्त चिखलाची दलदल होती अशा सुमारे 2 एकर जमिनीचे आता जीवन स्त्रोतात रूपांतर केले आहे.
यासाठी गेल्या दोन वर्षात या संपूर्ण जमिनीची खुदाई करण्याबरोबरच या ठिकाणी नव्याने बांध बांधून पाणी बाहेर पडण्याचे मार्ग तयार करण्यात आले. निसर्गाने देखील कृपा केली आणि या ठिकाणी खोदकाम वेळी कांही जिवंत झरे लागले.
ज्यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात सदर दलदलीच्या जमिनीचे रूपांतर एका प्रशस्त तलावात झाले आहे. प्यास फाउंडेशनच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून मन्नीकेरी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी ‘प्यास’ला दुवा देताना दिसत आहेत.