कोरोना संसर्गाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्तांसाठी हितावह असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन साठी शुल्क आकारण्याऐवजी ते मोफत उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक संस्था बेळगाव या संघटनेने केली आहे.
ज्येष्ठ सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक संस्था बेळगावतर्फे राहुल पाटील यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन बेळगाव विभागीय आयुक्तांना सादर केले.
सध्याच्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे होण्यासाठी डॉक्टरांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन सुचविले जात आहे. मात्र सदर इंजेक्शनची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही आणि ही इंजेक्शन एक तर बाजारात पुरेशी उपलब्ध नाहीत किंवा त्यांच्या सार्वजनिक विक्रीवर निर्बंध करण्यात आला आहे.
त्यामुळे सरकारी अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातलगांना हे इंजेक्शन मोफत मिळवण्यासाठी मुख्य आरोग्य अधिकार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र घ्यावे लागत आहे. या सर्व प्रक्रियेतसाठी वेळ लागत असून रुग्ण व त्याच्या नातलगांना मनस्ताप होत आहे.
तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोरोनाग्रस्तांच्या हितासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी राहुल पाटील यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते नागेश देसाई, धाकलू ओऊळकर आणि डॉ. तानाजी पावले उपस्थित होते.