दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू न करता मालमत्ता कर भरण्याची मुदत सध्याचा क्लोज डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर एक महिन्याने वाढवून दिली जावी, अशी मागणी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या विविध सेवाभावी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी स्वतः उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकार्यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव शहरातील मालमत्ता कर भरण्याची आज 30 एप्रिल 2021 ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर उद्यापासून 15 टक्के दंड आकारून मालमत्ता कर भरून घेतला जाणार आहे. गेल्या कांही दिवसांपासून कोरोनाचा कहर झाला आहे.
त्यामुळे आधीच संकटात सापडलेले नागरिक या दंड आकारणीमुळे आणखी अडचणीत येणार आहे. त्याचप्रमाणे कर भरण्यासाठी उपलब्ध असलेली बेळगाव वन ही ऑनलाईन सुविधा देखील बंद आहे. बँकांमध्ये मालमत्ता कर भरून घेण्यास नकार दिला जातो. या सर्व बाबी ध्यानात घेऊन मालमत्ता कर भरण्याचा कालावधी वाढवून दिला जावा सध्याचा क्लोज डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुढील एक महिन्याचा कालावधी मालमत्ता कर भरण्यासाठी दिला जावा. तसेच तूर्तास दंड आकारणी केली जाऊ नये, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फॉर नीडी, फुड फॉर नीडी आणि एज्युकेशन फॉर नीडी या संघटनांच्याववतीने निवेदन सादर करतेवेळी सुरेंद्र अनगोळकर यांच्यासमवेत कोरोना मार्गदर्शक सूचीनुसार फक्त योगेश कलघटगी उपस्थित होते.
यावेळी अनगोळकर यांनी बेळगाव लाईव्हला आपल्या मागणी संदर्भात माहिती दिली. उपरोक्त निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री तसेच संबंधित अन्य लोकप्रतिनिधींना घालण्यात आल्या आहेत.