बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये सुरक्षततेच्या दृष्टीने विश्वास निर्माण व्हावा त्यांनी निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने शहरांमध्ये आज शनिवारी सकाळी पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पथसंचलन पार पडले.
कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून या पथसंचलन आला प्रारंभ झाला. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी हिरवा बावटा दाखवून पथसंचलनाचा शुभारंभ केला. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेले पोलीस व सीआरपीएफ जवानांचे हे शिस्तबद्ध पथसंचलन सार्यांचे लक्ष वेधून घेत होते. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान येत्या शनिवार दि. 17 एप्रिल रोजी होणार आहे त्यासाठी जनतेमध्ये सुरक्षिततेचे व विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनतर्फे या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
पथसंचलनाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. के. हरीशकुमार म्हणाले की, बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी सर्व प्रकारचे क्रम घेण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता निर्भयपणे मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व ती खबरदारी आणि क्रम घेण्यात आले असून त्याबाबत जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून हे पथसंचलन करण्यात आले आहे असे सांगून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन डॉ. हरीशकुमार यांनी केले.
सदर पथसंचलनात सीआरपीएफ दल, पोलीस, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल, शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आदी विविध सुरक्षा दलांचा समावेश होता. कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून काकतीवेस, खडक गल्ली, खंजर गल्ली, खडेबाजार आदी विविध संवेदनशील भागातून हे पथसंचलन काढण्यात आले. स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांच्यासह बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या उपायुक्त यशोदा वंटगोडी, गुन्हे शाखेचे डीसीपी मुत्तूराज, एसीपी नारायण बरमणी, एसीपी चंद्रप्पा आदी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या पथसंचलनात भाग घेतला होता.