सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून या हंगामावर आमचा वर्षभराचा चरितार्थ चालतो. तेंव्हा लग्न समारंभ आदींवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नारायण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ते सरकार दरबारी धाडण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष नारायण चौगुले म्हणाले की, गेल्या वर्षी 2020 साली कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेंडाल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेटर्सवर तर संकटच कोसळले आहे.
गेल्यावर्षी कोरोनाला प्रारंभ झाल्यापासून खाजगी तसेच सार्वजनिक सभा समारंभ आणि कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्ष आम्ही कसेबसे ढकलले. आता गेल्या डिसेंबर 2020 पासून पुन्हा सर्व कांही सुरळीत होईल असे वाटत होते. त्यामुळे मागील वर्षातील नुकसान भरून काढण्यासाठी या वर्षभरासाठी आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुनश्च निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सध्या लग्नासारख्या समारंभात बंदिस्त जागेत 50 आणि खुल्या जागेत 150 लोक असा निर्बंध घालण्यात आला आहे. परिणामी आम्हा पेंडल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेटर्सना पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. आमचा व्यवसाय हा कामगारांवर अवलंबून असल्यामुळे नव्या निर्बंधांमुळे आमचे जगणे मुश्कील होणार आहे. शिवाय वर्षातील एप्रिल व मे हे दोन महिने लग्नसराईच्या हंगामाचे असतात असे सांगून या फक्त दोन महिन्यांवर आमचे संपूर्ण वर्षभराचे अर्थकारण ठरत असते. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे, असे चौगुले यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी नारायण चौगुले यांच्या समवेत व्ही. एस. काकतकर, एम. डी. मणियाळ, श्रीनाथ अष्टेकर, महेश मोरे, प्रवीण चौगुले, ए. फर्नांडिस, परशुराम साळुंखे, विनायक पालकर,बाळू जोशी, आदी पेंडॉल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स उपस्थित होते.