Monday, December 23, 2024

/

शहरात शटर डाऊन सुरु; मात्र मोठ्या व्यावसायिकांचे आतून कामकाज सुरूच! छोट्या व्यवसायिकांतून नाराजी

 belgaum

राज्य सरकारने २७ एप्रिल च्या सायंकाळपासून १४ दिवस म्हणजेच १२ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज सायंकाळी शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, संयुक्त महाराष्ट्र चौकासह अनेक ठिकाणी पोलिसांनी शटर डाऊन मोहीम सुरु केली.

मात्र संयुक्त महाराष्ट्र चौकातील एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कापड व्यायवसायिकावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कापड दुकानात आतून कामकाज सुरूच असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे इतर व्यवसायिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय पोलिसांनी या दुकानदाराला शटर डाऊन करण्यास का सांगितले नाही? असा संतप्त सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.

राजकीय पक्षाचा वरदहस्त लाभलेल्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील दुकानावर कारवाई न करण्यात आल्याने इतर व्यावसायिकांनी याविरोधात आवाज उठविला. तसेच हे दुकान सुरु असून इतर व्यावसायिकांवर मात्र जबरदस्तीने शटर बंद करण्यासाठी पोलिसांनी सांगितले. यासंदर्भातील व्हिडीओ देखील व्हायरल झाले. शहरातील इतर व्यावसायिकांनी वेळेत आपले व्यवसाय बंद न केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु या दुकानदारावर मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

बेळगाव शहरातील व्हॉलसेल कपडा मार्केट समजली जाणाऱ्या पांगुळ गल्ली,भेंडीबाजार आणि भोई गल्लीतील बोळ भागातील अनेक कपडा दुकानात शटर बंद ठेऊन व्यापार सुरू होता मात्र मनपा व पोलिसांनी या भागात देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. अधिकाऱ्यांनी तोंड बघून कारवाई करू नये सर्वांना समान वागणुक द्यावी अशीही मागणी केली जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार कडक निर्बंध लागू झाले आहेत. महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना काही आस्थापने आणि दुकानांचे शटर डाऊन करून आतमध्ये विक्री होत होती. अशा आस्थापनांविरोधात बेळगाव महापालिकेने कारवाई केली आहे.Cloth shops

खडे बाजारमधील मंगलदीप शोरुम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील जगजंपी बजाज शोरुमवर ही कारवाई झाली. मंगलदीप शोरुममध्ये शटर बंद करुन व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिका कर्मचारी व पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आत कर्मचारी व ग्राहक मिळून शेकडो जण असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना तातडीने बाहेर काढण्याची सूचना देण्यात आली. कर्मचारी व ग्राहक बाहेर पडल्यानंतर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनविक्री व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण, जगजंपी बजाज शोरुम सुरु असल्याची माहिती महापालिकेला मिळाली. त्यामुळे, महापालिकेच्या पथकाने प्रत्येकी दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

दुकानदारांसाठी नियम शिथील केलेले नाहीत. दुकाने बंद असल्याने अनेक दुकानदारांनी नवी शक्कल लढविली आहे. बंद दुकानासमोर दुकानाशी संबंधित एक कामगार उभा राहतो. काही दुकानांना मागच्या बाजूने दार आहे. मागच्या दाराने काही दुकानात व्यवहार सुरू आहे. काही दुकानात बंद शटरच्या आड खरेदी विक्री सुरू आहे.

त्याचा प्रत्यय बेळगाव शहरातील बाजारपेठ परिसरात आल्याने महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. मात्र, यामुळे कोरोना आणखीन पसरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रकार केवळ शहरातील बाजारपेठेत सुरू नसून शहापूर आणि वडगावच्या काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करून खरेदी-विक्री करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.