खानापूर तालुक्यातील एकट्या अबनळी गावामध्ये तब्बल 145 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे विविध वृत्तपत्रात नव्याने उघडकीस येणाऱ्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि आरोग्य खात्याच्या प्रसिद्धीपत्रकातील आकडा यामध्ये धक्कादायक तफावत दिसून येत आहे.
खानापूर तालुक्यातील अबनळी हे गाव सुमारे 350 -360 लोकवस्तीचे आहे. यापैकी 145 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 360 ग्रामस्थांपैकी 144 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली असून हे सर्व जण गोवा आणि महाराष्ट्रातून आलेले आहेत.
या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान हिंदू या इंग्रजी दैनिकाने सदर बाधितांपैकी बहुतांश जणांमध्ये रोगाची लक्षणे नाहीत तर काहींमध्ये अगदी अंशतः असल्याचे नमूद केले आहे.
दैनिक सकाळ या वृत्तपत्राने कालचा नव्याने आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 394 इतका प्रसिद्ध केला आहे. परंतु आरोग्य खात्याच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये तो 188 इतका आहे. प्रसिद्धीपत्रकात मंगळवारी खानापूर तालुक्यात फक्त 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे नमूद आहे. दरम्यान तहसीलदारांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसह अबनळी गावाला भेट दिली असून गावात खास वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.