कर्नाटकात जातीय आणि भाषिक अशा दोन मुद्यांवर निवडणुका होतात. एका भाषेच्या उमेदवाराचे वर्चस्व दुसऱ्या भाषिक उमेदवाराला त्रासदायक ठरते तसेच जातीय राजकारणही महत्वाचे ठरत जाते.
निवडणूक आयोगाने जात, भाषा आणि इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवू नका असे निर्बंध घातले तरी स्वाभाविक सहकार्य आणि आपल्या माणसाला सत्ताधीश करण्याची माणसा माणसा मधील भूमिका शांत बसू देत नाही. शिवाय लोकशाहीनेच तसा अधिकारही दिलेला आहे.
सध्याच्या परिस्थितीत लोकसभा पोटनिवडणुकीत बेळगावची लढाई अशीच सुरू आहे. ही लढाई राष्ट्रीय पक्षांना अवघड जात असून एकगठ्ठा मराठी मते जर समिती उमेदवाराला पडली तर मराठा समाज आणि मराठी भाषिक या निवडणुकीत विजयी होऊ शकतो.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ बहुभाषिक आहे. 18.27 लाख एकूण मतदार आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक संख्या आहे लिंगायत मतदारांची. लिंगायत मतदार 6.25 लाख आहेत. यापाठोपाठ 3.25 लाख मराठा मतदारांचा क्रमांक लागतो. 1.80 लाख कुरबर, 65 हजार विणकर,40 हजार जैन,40 हजार ब्राम्हण तसेच 2 लाख मुस्लिम आणि 2 लाख मागासवर्गीय मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघात सध्या एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेस मध्ये खरी रस्सीखेच सुरू असून त्यांना समितीच्या शुभम शेळके यांचे आव्हान आहे. बेळगाव उत्तर,बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण या तीन विभागातील एकगठ्ठा मराठी मते, काँग्रेस आणि भाजप मधील नाराज वर्गाची मते तसेच मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची 20 टक्के मते जरी शुभम शेळके यांना पडली तर विजय निश्चित असल्याचे राजकीय अभ्यासक सध्या बोलत आहेत.
सुरेश अंगडी लिंगायत आणि मराठा मतांवर निवडून येत होते. याच मतांवर भाजपची अर्थात मंगला अंगडी यांची भिस्त आहे. मात्र महागाई व इतर अनेक कारणांमुळे जनतेत भाजप बद्दल नाराजी असून याचा फटका बसेल की लोक सहानुभूतीने त्यांना मतदान करतील हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. घराणेशाही नाही असे म्हणणाऱ्या भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेला भाजप मधील अंतर्गत गट सावरला गेला नाही तर भाजपला ही निवडणूक अवघड ठरणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे वाल्मिकी नायक समाजातील असून आपण जातीय समिकरणांवर विश्वास ठेवत नाही असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे सर्व समाजातील लोकांचा पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. दिग्गज नेत्यांना आमंत्रित करून सर्व समाजाच्या गाठीभेटी घेण्यावर काँग्रेसचा भर आहे. 15 वर्षांपासून भाजपने काँग्रेसला या मतदारसंघात डोके वर काढू दिलेले नाही, यामुळे काँग्रेसची परिस्थीती अवघडच आहे.
साखर आणि लिकर या दोन उद्योगातून आलेल्या सतीश यांचे गोकाक, आरभावी,रामदुर्ग भागात वर्चस्व आहे तर बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मध्येही त्यांचे समर्थक आहेत. याचा फायदा ते कितपत करून घेतात? हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
समितीने आजवर उमेदवारी न देण्यावर भर दिला होता. पण यंदा युवकांच्या आग्रही मागणीपुढे नेत्यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. सुरुवातीला पन्नास हजार तरी मते मिळतील की नाही असा प्रश्न राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेला असताना आता शुभम शेळके विजयी होतील असा विश्वास अनेकजण व्यक्त करीत आहेत. निवडणुकीतील बदलती परिस्थिती पाहता एकगठ्ठा मराठा, काही मुस्लिम आणि मागासवर्गीयांची मते घेतल्यास शुभम शेळके हा सिंह दिल्लीत जाऊ शकतो.


