बेळगाव शहरात कांही कोरोनाबाधितांवर नातेवाईकांकडून थेट अंत्यसंस्कार केले जात असल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता शहरातील सर्व स्मशानभूमींवर महापालिकेची करडी नजर राहणार आहे. यासाठी स्मशानभूमींची यादी तयार करण्यात आली आहे.
शहरात सदाशिवनगर, शहापूर, अनगोळ आदी ठिकाणी महापालिकेची स्मशानभूमी आहे. तथापि विविध जाती धर्माच्या स्वतंत्र स्मशानभूमी देखील आहेत. त्यांची माहिती मंगळवारी महापालिकेने जमा केली असून शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची माहिती घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कांही कोरोनाबाधितांवर नातेवाईकांकडून थेट अंत्यसंस्कार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डाॅ. के. हरीशकुमार यांनी शहरातील सर्व स्मशानभूमीवर करडी नजर ठेवण्याची सूचना महापालिकेला दिली आहे. स्मशानभूमीत होणाऱ्या प्रत्येक अंत्यसंस्काराची माहिती घेतली जावी. बाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले असतील तर संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आले त्यांची माहिती घेऊन त्यांना तातडीने काॅरंटाईन करावे असे सांगण्यात आले आहे.
सध्या बेळगाव शहरात कोरोनाबाधितांवर दोन ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत. हिंदू धर्मियांवर सदाशिनगर स्मशानभूमी तर मुस्लिम धर्मियांवर अंजुमन -ए -इस्लाम संस्थेच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. तथापि लिंगायत, ब्राह्मण, ख्रिश्चन तसेच अन्य समाजासाठी शहरात स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. आता तिथे होणाऱ्या अंत्यसंस्काराची माहिती महापालिका घेणार आहे. शहापूर व अनगोळ येथे महापालिकेची स्मशानभूमी असली तरी तेथे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.
परंतु गतवर्षी आणि यंदा देखील या ठिकाणी कोरोनाबाधितांवर थेट अंत्यसंस्कार केल्याची प्रकरणे आहेत. कांही प्रकरणांमध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे उघडकीस आले आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत अशी सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिली आहे. यासाठी प्रशासन विभागाने आरोग्य विभागाशी संपर्क साधून काल मंगळवारी शहरातील सर्व स्मशानभूमींची माहिती घेतली आहे.