संपाचा सातवा दिवस उजाडला तरी सुद्धा ना मुख्यमंत्री येडियुरप्पा येऊन भेटले ना परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी आमच्या मागण्यांची दखल घेतली. आज उगादी म्हणजेच गुढीपाडवा असून सुद्धा आम्ही सण साजरा करू शकत नाही. आम्ही तुमच्याकडे भिक्षा मागतो आम्हाला भीक घाला म्हणजे आम्ही सण साजरा तरी करू शकू, अशा शब्दात परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यात सरकार पूर्णतः असमर्थ ठरले असून या संपामुळे कर्मचारी व प्रवासी या सर्वांचेच हाल सुरू आहेत. आपल्याला गेल्या 3 महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वेतन वाढीचा मुद्दा सरकार विचारतच घेत नाही. शिवाय आम्ही काम केलेल्या आपल्या कामाचे वेतन देखील आम्हाला अद्याप मिळालेले नाही. आम्ही जगायचे तरी कसे? असा प्रश्न संपकरी कर्मचार्यांच्या कुटुंबातील महिलांनी केला आहे.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोमवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ताटे वाजवून आंदोलन छेडले. त्यानंतर आज बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी चक्क पात्र पुढे करून भिक्षा मागण्यास सुरुवात केली. सरकार तर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. निदान तुम्ही तरी आमच्या भावनांची कदर करा आणि आम्हाला भीक घाला म्हणजे आम्ही सण साजरा करू असे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला व मुले ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सांगत होत्या.
दरम्यान, संपाचा सातवा दिवस उजाडला तरी अजूनही तोडगा न निघाल्याने सामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे. रिक्षाचालकांचे दाम दुप्पट दर त्यांना परवडत नाहीत आणि परिवहनच्या बस नियमित सुरू नाहीत.
खाजगी टेम्पो किंवा वाहनांमध्ये कमालीची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. एकंदर परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या या संपाने अनेक प्रश्न निर्माण केले असून कोविड काळात हा संप करणे समर्पक होते का? असाही प्रश्न विचारला जात आहे.