Sunday, January 19, 2025

/

परिवहन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा आदेश; बससेवा पूर्ववत

 belgaum

विविध मागण्यांचं पूर्ततेसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारने सामान्यांची अडवणूक न करता सेवेवर हजर राहण्याचे आवाहन कर्मचार्‍यांना केले आहे. सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. मात्र, याला बेळगावातून प्रतिसाद मिळाला नाही. हळूहळू कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होऊ लागल्याने संपाची धार कमी होत चालली आहे.

मंगळवारी बेळगाव आगाराच्या ९० बसेस धावल्या. यापैकी लांब पल्ल्याच्या ४ बसेसचा समावेश आहे. संप सुरु झाल्यापासून तुरळक प्रमाणात बससेवा सुरुच आहे. निपाणी, बैलहोंगल, हुक्केरी, चिकोडी, धारवाड, हुबळी, सौंदत्ती, रामदुर्गसह अनेक ठिकाणी मंगळवारी बस धावल्या. मात्र महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्रात धावणाऱ्या बस आगारातच थांबून आहेत. मंगळूर, बंगळूर, धर्मस्थळ या ठिकाणी बेळगावहून ४ बस रवाना झाल्या आहेत.

सहाव्या वेतन आयोगासह इतर मागण्या पूर्णपणे लागू झाल्यानंतर संप मागे घेण्याचा पवित्रा परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी घेतला आहे. सलग पंधराव्या दिवशीही संप सुरू राहिल्याने बेळगाव जिल्ह्यातील बससेवा कोलमडली. अशातच सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाने सुनावणी केली असून आपल्या मागण्यांसाठी सर्वसामान्यांना वेठीस न धरता लवकरात लवकर बससेवा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

बेळगावामध्ये बुधवारी सकाळपासून अनेक मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरु करण्यात आली. त्यामुळे जादा तिकीट दर आकारणाऱ्या खासगी वाहन चालकांपासून प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी सरकारी बससेवेला प्रतिसाद देण्यास सुरवात केली आहे. विजयपूर, बागलकोटसह अन्य प्रमुख ठिकाणी बससेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून बेळगाव शहरातही बुधवारी अनेक मार्गांवर शहर बससेवेला प्रारंभ झाला. ग्रामीण भागातही बस धावू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात सर्वसामान्यांना बससेवा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परंतु पुन्हा एकदा पूर्ववत बससेवा सुरु होण्याच्या बातमीने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.