कोरोना प्रादुर्भावाची भीषणता तीव्र झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरण्याबरोबरच प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रहदारी पोलिसांनी देखील आता संभाव्य धोका ओळखून खबरदारी घेताना गेल्या तीन दिवसांपासून वाहनांची तपासणी करणे बंद केले आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने पसरत चालला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली असून ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकारने राज्यात 12 मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला आहे.
गतवर्षी बेळगाव जिल्ह्यासह शहरात बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष करून 24 तास रस्त्यावर थांबून सेवा बजावणाऱ्या रहदारी पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. आता गतवर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या पार्श्वभूमीवर दररोज रस्त्यावर थांबून वाहनांची अडवणूक करत कागदपत्रे तपासणारे वाहतूक पोलीस सध्या रस्त्यावरून गायब झाले आहेत.
कोरोनाचा धोका ओळखून खबरदारी म्हणून वाहनाची तपासणी बंद करण्यात आली आहे. मात्र रहदारी पोलिसांना अद्यापही खात्याकडून वाहन तपासणी थांबवण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे रहदारी पोलिसांमध्ये अस्वस्थता व नाराजी व्यक्त केली जात आहे.