राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. याला आळा घालायचे असल्यास लोकांनी मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा राज्यात कठोर निर्बंध लावण्याची वेळ येईल, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी 18 एप्रिलनंतर राज्यात लॉक डाऊन नसला तरी अधिक कडक नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
बेळगाव, बसवकल्याण आणि मस्की येथील पोटनिवडणूक मतदान झाल्यानंतर कठोर नियम लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे. आवश्यकतेनुसार आणखी कांही जिल्हा केंद्रांवर रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यु) वाढविण्याबाबतही सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी 18 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, 18 एप्रिलला बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन वगळता सर्व उपाय आणि पर्यायांवर चर्चा होईल. महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार शेजारच्या राज्यांमध्ये सुरू केलेल्या उपाययोजनांवर देखील चर्चा होईल असे सांगून ते पुढे म्हणाले आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पावले उचलू.
आठवड्याच्या शेवटी ‘वीकेंड कर्फ्यू’ चा कोणताही प्रस्ताव नाही. परंतु रात्रीची संचारबंदी राज्यात इतर भागात वाढवता येईल का? यावर विचार करण्यात येणार आहे. दोन ते तीन जिल्हा केंद्रांपर्यंत कर्फ्यू वाढविला जाऊ शकतो. कर्नाटकात सध्या बेंगलोर शहर आणि म्हैसूरसह 8 जिल्हा केंद्रात नाईट कर्फ्यू लागू आहे. बेंगलोरसह 8 शहरांमध्ये सध्या रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचार बंदी अर्थात नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्याचा परिणाम कितपत होतो? याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. रूग्ण संख्येत वाढ झाल्यास कठोर निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल.
कोरोनाचे रुग्ण आणि बळींची वाढती संख्या चिंताजनक स्थितीत पोचल्याने जिल्हा प्रशासनही अधिक गंभीर झाले आहे. लोकांनी आपली जबाबदारी विसरू नये. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे. कोणताही निर्णय घेताना सामान्य जनतेचा विचार करूनच पुढचे पाऊल टाकले जाईल असेही मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी शेवटी सांगितले.