राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याकारणाने नाईट कर्फ्यू विस्तारित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बंगळूर येथे दिली. बंगळूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांशी दीड तास चर्चा करण्यात आली. ८ शहरांमध्ये २० एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू सुरु राहणार असून बेंगळुरू, म्हैसूर, तुमकूर, उडुपी, मंगलोर, बिदर, कलबुरगी आणि मनिपाल येथे रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत कर्फ्यू लावण्यात आला आहे. परिस्थिती पाहून २० एप्रिल रोजी पुन्हा चर्चा करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सल्ला घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसहित मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनीही यासंदर्भात माहिती दिली असून आवश्यकता भासल्यास राज्यात कडक निर्बंध लादण्यात येतील असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू जारी केला आहे, परंतु त्या राज्यात ज्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे, तशी कर्नाटकात परिस्थिती नाही. आपल्या राज्याची तुलना आपण इतर राज्यांशी करू नये. आपल्या राज्यात आणि इतर प्रत्येक राज्यासाठी परिस्थिती भिन्न आहे. आम्ही कोरोना नियंत्रणासाठी कडक कारवाई करीत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला घेऊन कर्नाटक राज्यात लॉकडाउन वगळता अन्य कठोर निर्बंध लावण्यात येतील, असे येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.
बेंगळुरूमध्ये कठोर कोविड-१९ नियमांची कठोर अमलबजावणी होणार आहे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. या पार्श्वूभूमीवर सीएम येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत तज्ज्ञांनी कोरोनाचा विषय उचलला आहे. विविध समारंभ, कार्यक्रमात लोकांची गर्दी कटाक्षाने टाळण्यात यावी. विवाह सोहळ्याचे आयोजन खुल्या मैदानात असल्यास २०० पेक्षा अधिक लोक सहभागी होऊ नयेत. तर सभागृह, खोली किंवा तत्सम ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्यास १०० पेक्षा अधिक लोक उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. याची नियमावली आज सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात तीन ठिकाणी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर 18 एप्रिल रोजी यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतरही निर्णय घेण्यात येईल.