बेळगाव जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरात नव्याने मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. कोरोनाची सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने शहरात 4 मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत.
बेळगाव शहर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट झाला असल्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. यातच मार्कंडेयनगर येथे एकाच ठिकाणी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे या ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. बेळगाव शहरात चार ठिकाणी ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत.
सदाशिवनगर, भारतनगर, बीम्स होस्टेल आणि मेघदत्त सोसायटी या ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. आता मार्कंडेयनगर येथे देखील कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळले असल्यामुळे त्याठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत परवानगी दिली असून शुक्रवारी मार्कंडेयनगर येथे बॅरिकेट्स लावून कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. गेल्या कांही दिवसांपासून सदाशिवनगर परिसरात सातत्याने कोरोना बाधितांचे आकडा वाढत आहे.
खासबाग येथेही एकाच घरात 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेथे देखील मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसाकाठी हजाराकडे झेपावत आहे. त्यापैकी निम्मे रुग्ण हे बेळगाव शहरात सापडत असल्यामुळे आरोग्य खाते चिंतेत पडले आहे.