बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 35 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 1 एप्रिल 2020 रोजी बेळगावातील बेळगुंदी, कॅम्प आणि हिरेबागेवाडी येथे पहिले 3 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले होते. आता वर्षभरानंतर आज शुक्रवार दि. 2 एप्रिल 2021 रोजी नव्याने आढळलेल्या 35 रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,495 इतकी झाली आहे.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 2 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,90,720 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 34,771 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 272 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 26,747 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,28,480 आहे.
कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,89,178 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,495 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज शुक्रवारी नव्याने आढळलेल्या 35 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,89,178 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 272 आहेत. त्याचप्रमाणे 2,978 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 344 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,879 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 13, रायबाग 12, गोकाक 3, अथणी 2, बैलहोंगल, चिक्कोडी, हुक्केरी, खानापूर व इतर प्रत्येकी 1 अशा एकुण 35 रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या जुलै 2020 पासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊन स्थिरता येत होती. मात्र गेल्या 15 मार्च 2021 पासून रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. तेंव्हा नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे आणि खबरदारीचे अत्यंत काटेकोर पालन करून प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.