परिवहन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण कर्नाटकात आंदोलन सुरु आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांचे आंदोलन न थांबल्यास निवडणुकीसाठी महाराष्ट्र एस. टी. महामंडळाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली. शिवाय महाराष्ट्राने निवडणूक कामासाठी ५०० बस पुरविण्याची तयारी दर्शविली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी दिली आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांच्याआंदोलनाचा परिणाम निवडणूक सेवेवर होणार आहे. आंदोलन मागे न घेतल्यास मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी, ईव्हीएम यंत्रे नेण्यात अडथळे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी महाराष्ट्राशी संपर्क साधला असून कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिल्यास महाराष्ट्राची लाल एसटी बेळगावच्या पोटनिवडणुकीत सेवा बजावणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
निवडणूक कार्यात मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी बस आणि वाहनांची व्यवस्था आवश्यक असते. त्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाकडे बसची व्यवस्था करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तरीही गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. असे जिल्हाधिकारी म्हणाले. पोटनिवडणुकीसाठी ४०० ते ५०० बसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यासह खासगी बस चालकांशीही याबाबत चर्चा करण्यात आली आहे. इतके असूनही निवडणुकीसाठी प्लान बी तयार असून महाराष्ट्र एस. टी. महामंडळाशी चर्चा करण्यात आली आहे. गरज भासल्यास महाराष्ट्र एसटी महामंडळ ५०० बसेस निवडणूक कार्यासाठी देण्यास तयार आहे. शासकीय पातळीवर यासंबधी चर्चा सुरू असून सर्व बाबींवर चर्चा केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी दिली.