गेल्या ६४ वर्षांपासून सीमालढ्याची धग उराशी बाळगून असलेल्या सीमाभागात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर कर्नाटकात अन्यायाने डांबलेल्या सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उदय झाला. सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिक हा महाराष्ट्र एकीकरण समितीशी प्राणापेक्षाही जास्त एकनिष्ठ होता. त्यावेळी सीमाभागातील नेतेमंडळीही तशीच तडफदार आणि झंझावाती होती. यादरम्यान सीमाप्रश्नातील एक ज्वलंत राजकारणी नेते म्हणून कै. बळवंतराव सायनाक यांचे नाव अग्रभागी होते. सीमाप्रश्नाची ज्वाला अखंड आणि तितक्याच ताकदीने तेवत ठेवण्यामध्ये कै. बळवंतराव सायनाक यांचा मोलाचा वाटा होता.
निवडणूक काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावाने एखाद्या दगडाला जरी शेंदूर फासून उमेदवार म्हणून उभा केला तर शंभर टक्के तो उमेदवार निवडून येईल, असे समीकरण मराठी भाषिक आणि समितीचे होते. १९६२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बळवंतराव सायनाक यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती तर्फे निवडणूक लढविली. बळवंतराव सायनाक हे नाव सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीप्रमाणेच फोफावले होते. या निवडणुकीत बळवंतराव सायनाक यांचे निवडणूक चिन्ह ‘सिंह’ होते. याची पुनरावृत्ती २०२१ च्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत झाली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांनाही या निवडणुकीत ‘सिंह’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे सीमाभागात हा विषय सकारात्मक पद्धतीने चर्चेत आला आहे.
सुरुवातीच्या काळात सीमालढ्याची धग अत्यंत ज्वलंत असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा प्रचार हा ‘सिंह समिती सायनाक’ अशा ब्रीद वाक्यात व्हायचा. आजही सीमाभागातील अनेक जुन्या गल्ल्या, बोळ आणि चौकांमधील भिंतींवर ‘सिंह समिती सायनाक’ हे ब्रीद कोरलेले दिसून येते. शिवाय बळवंतराव सायनाक यांच्यावेळी प्रत्येक गल्लोगल्ली लहान मुलांच्या तोंडीही ‘सिंह समिती सायनाक’ अशी प्रचाराची हाक ऐकू यायची. सीमालढ्याचा हा इतिहास आता पुन्हा एकदा जागृत झाला असून २०२१ च्या लोकसभा निवडणुकीत ‘सिंह समिती शेळके’ हे ब्रीद सोशल साईटवर झळकत आहे.
सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीची समीकरणे गेल्या काही वर्षात बदलली आहेत. समितीमध्ये पडलेली खिंडार दूर सारून एकीसाठी हाक देण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती उदयाला आली. प्रचंड व्हायरल पोस्ट आणि शुभम शेळके यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याची मागणीही झाली. शुभम शेळके यांनी उमेदवारीचा अर्ज भरला. आणि काही काळातच महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृतरीत्या त्यांचे नावही जाहीर केले. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची चिन्हे जाहीर झाली. आणि यात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती दिसून आली. बळवंतराव सायनाक यांना मिळालेले निवडणूक चिन्ह पुन्हा एका तडफदार नेतृत्वाला मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मराठी वर्चस्व प्रस्थापित होणार, आणि इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी चर्चा मराठी भाषिकातून होत आहे.
शुभम शेळके यांना युवा वर्गासह सीमाभागातील असंख्य मराठी भाषिकांचा वाढता पाठिंबा आहे. राष्ट्रीय पक्षांच्या बरोबरीने शुभम शेळके यांना सोशल साईटवर जाहीर रित्या पाठिंबा देण्यात येत आहे. शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात उठविलेल्या आवाजामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी ते एक नवी उमेद ठरले आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना मिळालेल्या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय नक्की होणार, असा विश्वास मराठी भाषिकांतून व्यक्त केला जात आहे.