Monday, January 20, 2025

/

कोरोना नियंत्रणासाठी मार्शल पथक

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी 121 कोरोना मार्शल पथकांची नियुक्ती केली आहे. कोरोना नियमावलींचे पालन करण्यासाठी आणि वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील ३३ स्थानिक स्वराज्य संस्थांत ते कार्यरत राहणार असून नियमावलींच्या कडक अंमलबजावणीचे काम मार्शल पथक करणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी घोळक्याने कोणी जमू नये, बाजारात सामाजिक अंतर राखणे मास्कचा वापर करणे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, त्यांची कोरोना तपासणी करणे, दुकानदारांनी दुकानासमोर तीन फूट अंतरावर दोरीने अडथळा निर्माण करणे, विना मास्क फिरणाऱ्यांवर महापालिका व्याप्तीत २५० तर इतर ठिकाणी १०० रुपयांचा दंड आकारणे, लग्न आणि इतर समारंभात ५० टक्के लोकांचा सहभाग ठेवणे, परवानगी शिवाय लग्नाचे आयोजन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, अंत्यविधीसाठी ५० जणांना परवानगी देणे, खुल्या जागेत व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना सोशल डिस्टंसिंगबाबत सूचना देणे अशा जबाबदाऱ्या मार्शल पथक पार पाडणार आहे.

त्याचप्रमाणे विवाह, इतर समारंभात सभागृह क्षमतेनुसार ५० टक्के लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी आहे. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमासाठी खुल्या जागेत ५० लोक व हॉलमध्ये २५ जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी असेल. त्यानुसार धार्मिक उत्सव, समारंभात कोरोना नियावलीचे पालन होत आहे का, याकडे लक्ष ठेवतील. कोरोनाग्रस्तांना घरात वेगळी खोली आणि स्वच्छतागृह असणाऱ्यांना घरात विलगीकरणाची परवानगी देणे, अन्यथा त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करणे यासह इतर नियमावली पालन करण्यासाठी मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी अचानक धाड टाकण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मास्‍कचा वापर होत नसेल आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास त्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधित आस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मार्शल नियुक्तीच्या आदेशानुसार जिल्ह्यात १२१ मार्शल पथक तैनात करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा नगरविकास नियोजन अधिकारी ईश्वर उळ्ळागड्डी यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.