दिवंगत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी आणि बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यासंदर्भात मंगला अंगडी यांनी आपल्या फेसबुक पेजवर माहिती दिली असून आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे. कोणतीही लक्षणे कोरोनासंदर्भातील जाणवत नसून आपण सध्या होम क्वारंटाईन आहोत. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मंगला अंगडी यांनी केले आहे. सध्या मंगला अंगडी या बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगरातील संपीगे रोडवरील आपल्या निवासस्थानीच होम क्वारंटाईन झाल्या आहेत.
दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर बेळगावची पोटनिवडणूक जाहीर झाली. यावेळी प्रचारादरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले.
निवडणूक प्रचारादरम्यान सर्व नियम डावलल्यामुळे मुख्यमंत्र्यांसहीत अनेक राजकीय नेते मंडळी कोरोनाबाधित झाली आहेत. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (बेळगाव ग्रामीण), आमदार आनंद मामनी (सौंदत्ती, बेळगाव) यांचाही पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. राजकीय नेते मंडळी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना आता धसका लागला असून वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.