राज्यात सर्वत्र संचारबंदी करण्यात आल्याने शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस बेळगाव जिल्ह्यात देखील संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
यादरम्यान जनावरांनाही याचा फटका बसल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या जनावरांना आज पोलिसांनी खाऊ घातले. चाऱ्याअभावी रस्त्याकडेला बसलेल्या जनावरांची परिस्थिती ओळखून पोलिसांनी भुकेने व्याकुळलेल्या जनावरांना त्यांच्या खाण्याची सोय करून देऊन पोलिसांनी प्राणीप्रेमी दर्शविले आहे.
शहरातील बाजारपेठ बंद असल्याने टाकाऊ भाजीपाला खाऊन हि जनावरे रहात असत. परंतु दोन दिवसांपासून बाजारपेठ बंद असल्याने जनावरांचेदेखील हाल होत आहेत. यादरम्यान पोलिसांनी या जनावरांना केळी खाऊ घालून त्यांची भूक भागविली आहे.
गुरुवारपासून शहरात सेमी लॉकडाऊनचा आणि शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू लावल्याने गोंधळ उडाला आहे. मार्केट पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी शहरात फेर फटका मारत असताना रस्त्याकडेला बसलेली जनावरे निदर्शनास आली.
चाऱ्याअभावी जनावरे भुकेली असल्याचे त्यांना दिसून आली. यावरुन त्यांनी जनावरांसाठी केळी खरेदी केली व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जनावरांना केळी खाऊ घातली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल पोलीस दलात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.