राज्य सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊन मुळे सकाळी १० नंतर संपूर्ण शहरात शुकशुकाट दिसून आला. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही संपूर्ण शहर स्तब्ध झाले होते. मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी सुरु झाली असून नागरिकांनी या संचारबंदीला पाठिंबा दिला असल्याचे जाणवले.
सकाळी ६ ते १० यावेळेत अत्यावश्यक खरेदीसाठी मुभा देण्यात आल्याने अनेक ठिकाणी सकाळी ६ वाजताच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूसह मद्यखरेदीसाठी गर्दी केल्याचेही दिसून आले. बेळगावमधील फ्रुट मार्केट, रविवार पेठ, गणपत गल्ली, शनिवार खूट, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक यासह बेळगावमधील अनेक बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. इतकेच नाही तर सकाळी सकाळीच नागरिकांनी वाईन शॉपमध्ये देखील गर्दी केल्याचे निदर्शनास आले.
यानंतर सकाळी १० नंतर मात्र बेळगाव शहर पोलिसांनी चांगलीच फिल्डिंग लावली. खरेदीसाठी गर्दी केलेल्या नागरिकांना लाठीचा प्रसाद देत शहरातील व्यवहार बंद करण्यास सांगितले.
सायरन आणि पोलीस वाहनांच्या आवाजाने अनेक नागरिकांनी पळ काढला. भाजी, फळे, आणि फुले विक्री करणाऱ्या लहान व्यावसायिकांनाही पोलिसांनी घरी परतण्यास सांगितले. सकाळी १० नंतर मात्र संपूर्ण शहरात शांतता पसरली. पालिका आयुक्त जगदीश के. एच. आणि मार्शल पथकाने संपूर्ण शहराचा फेरफटका मारत परिस्थितीची पाहणी केली.