राज्यात 14 दिवसांचा संपूर्ण लॉक डाऊन जारी करण्यात आल्यामुळे बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने आपल्या नियोजित परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.
परिणामी या दोन्ही विद्यापीठाच्या आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आम्ही जातो अमुच्या गावा… असे म्हणत बेळगावला कांही काळासाठी रामराम ठोकून आपापल्या गावाकडे प्रयाण केले.
वह्या -पुस्तके, कपडेलत्ते, अंथरूण-पांघरूण असा सगळा बाडबिस्तरा गुंडाळून विद्यार्थी मंगळवारपासून आपापल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. राज्यव्यापी संपूर्ण लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री पासूनच राज्यभरात सरकारी व खाजगी बससेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
त्यामुळे आपल्या साहित्यासह परगावचे विद्यार्थी आणि नागरिकांचे जथ्थे मध्यवर्ती बस स्थानकावर मंगळवारी सकाळपासून दाखल होताना दिसले. आपापल्या गावाला जाणारी बस धरून या सर्वांनी बेळगावमधून प्रयाण केले. राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने आपल्या सर्व परीक्षा लॉक डाऊनच्या कारणास्तव पुढे ढकलल्या आहेत.
त्यामुळे परगावचे विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसायासाठी बेळगावात आलेले नागरिक मध्यवर्ती बस स्थानक गाठून आपापल्या गावी जाण्यासाठी घाई करताना दिसत होते.