बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव अबकारी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुगटे आलूर येथे बेकायदेशीर मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकून ६९८४ लिटर महाराष्ट्रातील मद्य जप्त करण्यात आले आहे. हुक्केरी तालुक्यातील बुगटे आलूर गावाबाहेरील राज्य महामार्गावर बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेला मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत तब्बल ८०० बाॅक्समधील ६९८४ लिटर मद्य पोलिसांनी जप्त केले असून संबंधितांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत प्रदीप शिवाजी राव (वय 48, रा. सईदापूर, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र) याला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हुक्केरी तालुक्यातील बुगटे आलूर येथे निवडणुकीनिमित्त सुरु केलेल्या तात्कालिक अबकारी चेकपोस्टवर कर्मचारी वाहनांची तपासणी करण्यात येत होती, यावेळी अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
वाहन क्रमांक MH 09 FL 0653 या ६ चाकी कंटेनरमधून घेऊन जाण्यात येत असलेले मद्य हे बेकायदेशीर असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. सदर मुद्देमालाचा परवाना तपासणी करण्यात आला. हे मद्य केवळ महाराष्ट्रात विक्री करण्याचा परवाना असूनही कर्नाटकात वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. अबकारी अप्पर आयुक्त एस.के. कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अबकारी उपायुक्त उत्तर विभाग, चिकोडी आणि अबकारी उपअधीक्षक चिकोडी उपविभागाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.