घरातील त्रास आणि भांडणाला कंटाळून तलावात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धेचे प्राण तलावाकाठी मासेमारी करणाऱ्या मुलांनी वाचविल्याची घटना आज सकाळी कणबर्गी येथील तलावाच्या ठिकाणी घडली.
तलावात उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेचे नांव श्रीमती रुक्मिणी पाटील (वय सुमारे 75 वर्षे, रा. खणगांव ता. जि. बेळगाव) असे आहे. याबाबतची माहिती अशी की, खणगांव येथील रुक्मिणी पाटील या वृद्ध महिलेने घरातील त्रास आणि भांडणाला कंटाळून आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कणबर्गी तलावामध्ये उडी घेतली होती. ही बाब कांही अंतरावर तलावात मासेमारी करणाऱ्या मुलांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन तलावात पडलेल्या वृद्ध रुक्मिणी यांना धाडसाने पाण्याबाहेर काढले. मात्र पुढे काय करायचे हे न कळल्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते “वन टच फाऊंडेशन”चे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील याना फोन करून घटनेची माहिती दिली. तेंव्हा विठ्ठल पाटील तातडीने कणबर्गी तलाव येथे दाखल होऊन त्या आजीबाईची विचारपूस केली. तसेच तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून खणगांव येथे संपर्क साधून तिच्या घरच्यांना बोलावून घेऊन घडलेली हकिकत सांगितली.
यावेळी वृद्ध रुक्मिणी आत्महत्या करायला का गेल्या? याचे कारण काय? आदी जाब विचारून विठ्ठल पाटील यांनी वृद्धेच्या घरच्यांना चांगली समज देऊन तिला त्यांच्या सोबत सुखरूप घरी पाठवून दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, गणेश यळळूरकर, आदर्श पाटील आदी उपस्थित होते.