कर्नाटकात सुरु असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एका परिवहन कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती विभागातील बस चालक आणि वाहक म्हणून सेवा बजाविणारा कर्मचारी शिवकुमार निलगार (वय 40) असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. सौंदत्ती शहरातील त्या कर्मचार्याने आपल्या राहत्या घरातच फाशी लावून आत्महत्या केली असून ते गेल्या १२ गेल्या 12 वर्षांपासून परिवहनच्या धारवाड विभागातील सौंदत्ती विभागामध्ये कार्यरत होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हा प्रकार कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच शिवकुमार यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांच्यावर उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही.
गेल्या दोन दिवसांपासून परिवहन कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाची मागणी रेटून धरत संप पुकारला आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या ९ मागण्यांपैकी ८ मागण्या पूर्ण केल्या असून सरकार सदर संप मागे घेण्याचीही विनंती करत आहे. परंतु कोणत्याही कारणास्तव हा संप मागे घेणार नाही, या पवित्र्यात असलेल्या कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे.
कर्नाटक काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीतील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या निवडणूक प्रचाराला येणार आहेत. यावेळी परिवहन कर्मचारी त्यांची भेट घेणार आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी संपातील त्या आत्महत्याग्रस्त कर्मचार्याला कामावर हजर राहण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.