कर्नाटक राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून काल गुरुवारी रात्री 11:59 वाजेपर्यंत नव्याने तब्बल 14,859 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 लाख 24 हजार 509 इतकी वाढली आहे. काल रात्रीपर्यंत राज्यात आणखी 78 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 4,031 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 10,03,985 इतकी झाली आहे. काल गुरुवार दि. 15 एप्रिल रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 14,859 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11,24,509 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1,07,315 ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 577 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राज्यभरात नव्याने 78 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 13,190 झाली आहे. राज्यात हवाईमार्गे आलेल्या 3 लाख 43 हजार 447 प्रवाशांचे आतापर्यंत स्क्रिनिंग झाले आहे. ब्रिटनहून राज्यात आज 249 प्रवाशांची आगमन झाले असून गेल्या 25 नोव्हेंबर 2020 पासून आत्तापर्यंत ब्रिटनहून कर्नाटकात आलेल्या प्रवाशांची संख्या 18,170 झाली आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात नव्याने 120 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 28 हजार 502 इतकी झाली आहे. उपचारांती बरे झाल्यामुळे जिल्ह्यात 112 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 378 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 771 ॲक्टीव्ह रुग्ण अर्थात सक्रिय रुग्ण असून कोरोनामुळे आज कोणीही दगावले नसल्यामुळे मृतांची संख्या 353 वर स्थिर आहे.