कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बेळगावमध्ये भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्र्यांना ताप आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान यावेळी त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांना पुढील उपचारासाठी बंगळूर येथील मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात देखील त्यांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस देखील घेतली आहे. परंतु तरीही मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जनतेमध्ये लस आणि कोरोनासंदर्भात उलट सुलट चर्चा होत आहे. बुधवारी बेळगावात प्रचारानंतर त्यांची डाँक्टरांनीही तपासणी केली होती. बेळगावात असताना कालपासून तापाचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी आज त्यांना बेंगळूरातील एमएस रामाय्या रुग्णालयात नेण्यात आले.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये सलग दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा, पत्रकार परिषद आणि प्रचार फेरीमध्ये सहभाग घेतला. रोड शोचेदेखील आयोजन करण्यात आले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जगदीश शेट्टर, प्रल्हाद जोशी, उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, मान्यवर, मंत्री, आणि अनेक मठाच्या स्वामींशी गुप्त बैठकही घेतली आहे.
रोड शो मध्ये सहभागी झालेल्या हजारो जणांमध्ये मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. रोड शोनंतर मुख्यमंत्र्यांनी युके २७ या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामुळे मुख्यमंत्री ज्यांच्या प्राथमिक संपर्कात आले आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग पसरण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.