लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये अनेक मंत्री उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. यादरम्यान एकमेकांविरोधात जोरदार टीकास्त्र मंत्रीवर्ग करत असताना दिसून येत आहेत. भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिद्धरामय्या आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.
काँग्रेसची सत्ता असताना, पाच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या काळात सिद्धरामय्या यांनी काहीच केले नाही. म्हणूनच त्यांच्या चामुंडेश्वरी मतदार संघातील जनतेने त्यांना रिजेक्ट केले. दुसऱ्या बाजूला जेलमध्ये राहून बेलवर बाहेर आलेले डी.के. शिवकुमार हेदेखील भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. राज्यातील आणि देशातील जनतेने काँग्रेसला पाठ दाखविली असून मतदारांनी रिजेक्ट केलेल्या सिद्धरामय्यांकडून विकासाची भाषा ऐकणे योग्य नाही, अशी टीका ईश्वरप्पांनी केली.
सिद्धरामय्या हे खोटे बोलण्यात सराईत आहेत. काँग्रेसचे डीकेशी आणि सिद्धरामय्या हे रिकाम्या घड्याळाप्रमाणे असून खोटे बोलणे हाच त्यांचा धर्म बनला आहे. त्यांच्या या धोरणामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. राज्यात होणाऱ्या तिन्ही पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावाही ईश्वरप्पा यांनी केला. काँग्रेस प्रचारार्थ आलेल्या सिद्धरामय्यांनी मंगला अंगडी यांच्यावर टीका करून अवमान केला आहे.
यावर ईश्वरप्पांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले असून एक महिला संसदेत जाऊन काय करू शकते हे सिद्धरामय्यांना चांगलेच माहित असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, प्रियांका गांधी यांनी राजकारणात येऊन निवडणूक लढवून संसद कशी गाजविली हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बेळगावमधील मतदार मंगला अंगडी यांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास ईश्वरप्पांनी व्यक्त केला.